ठाणे : विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांविरोधात वाहतूक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून दंड वसुली करतानाच सेवा पुस्तकात देखील त्याची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात हेल्मेट न घालण्याची प्रवृत्ती वाढली असून मुंबई आणि नागपूर वगळता इतर शहरात आणि जिल्ह्यात हेल्मेट घालण्याचे प्रमाण अत्यन्त कमी आहे. अनेक अपघातांत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे राज्याच्या वाहतूक विभागाने हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट घालत नसल्याचे आढळून आले असून अशा पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे चित्रण समाजमाध्यमावर नागरिकांनी टाकले तर त्यांच्याविरोधात वाहतूक नियमानुसार दंडवसुली करण्यात यावी तसेच त्यांनी जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केले असे समजून सेवा पुस्तकात नोंद करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रविण साळुंखे यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, अधीक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी देखिल विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चित्रण समाजमाध्यमावर टाकता येणार आहे.