अखेर ४८ तासांत मैदानाच्या सातबाऱ्यावर ठामपाचे नाव

ठाणे: वर्तकनगर भागातील ठाणे महानगरपालिकेच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाच्या सातबाऱ्यावर भलतेच नाव असल्याने याबाबत तातडीने हालचाली झाल्या आणि अवघ्या ४८ तासांत पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचे नाव सातबाऱ्यावर चढले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे (एकतावादी) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी याबाबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे तक्रार केली होती.

श्री जानकादेवी मंदिर व लिटील फ्लॉवर स्कूललगत असलेली सुमारे २.१५ हेक्टर म्हणजे सुमारे पाच एकर जागा (भूखंड क्र. १८२ तसेच व्हि.नं. १८८, १८९, ३६५, १९२, ३६६) ही सन २००३ मध्ये ठाणे महानगरपालिकेकडून खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आली होती. या जागेचा टीडीआरही एका खासगी विकासकाला देण्यात आला आहे, परंतु काही महिन्यांपूर्वी त्या ७/१२ उताऱ्यावरून ठामपाचे नाव परस्पर वगळण्यात आल्याची बाब श्री.इंदिसे यांनी उघडकीस आणली होती. त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचा सतत पाठपुरावा देखिल केला होता. त्याची दखल घेत ठामपाच्या विधी विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अपील दाखल केले असून काही महसूल अधिकाऱ्यांविरोधात तक्रारही करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संबंधित विभागांना समक्ष सुनावणी न देता ठाणे महापालिकेचे नाव सातबारावरून वगळण्याची प्रक्रिया झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित जागेवर मातीचे उत्खनन करून ती शेजारील ठिकाणी साठवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत ७ एप्रिल रोजी सायंकाळी श्री. इंदिसे यांनी तहसीलदारांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊनही तातडीची कारवाई न झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या उत्खननासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच शासनाचे शुल्क भरले होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

याशिवाय, काही व्यक्तींनी या भूखंडावर परवानगीशिवाय धार्मिक कार्यक्रम आयोजित करून स्टेज उभारल्याचाही आरोप करण्यात आला होता. संबंधितांना पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असतानाही कार्यक्रम पार पडल्याचे म्हटले आहे.

एकूणच, हा भूखंड मूळत: चर्चच्या मालकीचा असून नंतर ठामपाकडे आरक्षित खेळाचे मैदान म्हणून वर्ग करण्यात आला होता. महापालिकेचा भूखंड परस्पर स्वतःच्या नावावर करणाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी फसवणुकीचा गुन्हा दखल करणार कि नाही, असा सवाल श्री. इंदिसे यांनी उपस्थिती केला आहे.