श्रीरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अपघात समस्येवर शोधला उपाय
ठाणे: सध्याच्या वेगवान जगात रस्त्यावरील खड्डे आणि होणारे अपघात ही समस्या गंभीर झाली आहे. या समस्येवर उपाय सांगणाऱ्या श्रीरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय प्रयोगाने विज्ञान प्रदर्शनात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी तयार केलेल्या वाहनात वापरलेले अल्ट्रासोनिक सेन्सर रस्त्यावरील खड्डा ओळखून वाहनाचा वेग कमी होऊन वाहन थांबते. अशा वाहनांमुळे होणारे अपघात टाळता येतील, असा विश्वास शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केला.

श्री माँ विद्यालय, पातलीपाडा येथे ७ ते ८ फेब्रुवारी या काळात २५वे तेजस आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उपक्रम सादर केले. या प्रदर्शनात श्रीरंग विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता आठवी आणि नववीच्या वरिष्ठ गटाने ‘रस्त्यावर खड्डा येताच स्वतःहून थांबणारे वाहन’ हा प्रयोग सादर केला. हा प्रयोग आयुष पाटील, क्रिश पाटील, शाहिद घावटे आणि रयान शेख यांनी सादर केला. तर शिक्षिका विद्या देवाडिया, शीतल खैरनार आणि नीलम राणे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला दुसरे पारितोषिक प्राप्त झाले.
याबाबत शिक्षिका विद्या देवाडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या वाहनात १२ सेमीपेक्षा मोठा खड्डा ओळखला जातो. याकरिता अल्ट्रासोनिक सेन्सर वापरण्यात आले आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी दोन हजार रुपये खर्च आला. पावसाळ्यात विशेष अल्ट्रासोनिक सेन्सर वापरता येऊ शकते, अशी माहिती विद्या देवाडिया यांनी दिली. या गटाने विशेष मोबाईल ॲप देखील तयार केला असून हे ॲप एक किमी क्षेत्रातील खड्ड्यांचा शोध जीपीएसद्वारे घेता येतो, असेही देवाडिया यांनी सांगितले.
वाया जाणाऱ्या ऊर्जेचे वीजेत रूपांतर

श्रीरंग विद्यालयाच्या पाचवी ते सातवीच्या कनिष्ठ गटाने या प्रदर्शनात अन्न शिजवताना वाया जाणाऱ्या उष्णतेचे वीजेत रुपांतर करणारा प्रयोग सादर केला. गुंजन अवस्थी, मयंक माळी, श्रेया नाथ आणि चिन्मय अडविलकर अशी या विद्यार्थ्यांची नावे असून गायत्री सूर्यवंशी, तृप्ती देशमुख आणि अनुश्री नाईकसाटम या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. या प्रयोगास तिसरा क्रमांक मिळाला.
याबाबत बोलताना अनुश्री नाईकसाटम म्हणाल्या, अन्न शिजवताना निर्माण होणाऱ्या उष्णतेने पर्यावरण दूषित होते. हे प्रदूषण रोखताना वीज निर्मिती सुद्धा करता येईल, या उद्देशाने आमच्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सादर केला. या तंत्रात मुलांनी उष्णता शोषून घेणारी आणि त्यातून पुढे वीजनिर्मिती करणारी अवघ्या २०० रुपये किमतीची थर्मो इलेक्ट्रिक प्लेट वापरली. या प्लेटमुळे ०.५ ते १.५ व्होल्ट वीजनिर्मिती होते. दोन प्लेट वापरल्यास चार ते पाच व्होल्ट वीजनिर्मिती होऊन घरातील एलइडी बल्ब प्रकाशित होऊ शकतो, अशी माहिती नाईकसाटम यांनी दिली.