एनडीए खासदारांच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा

खासदार नरेश म्हस्के यांचा चर्चेत सहभाग

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एनडीएमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत विविध राज्यांतील एनडीए घटक पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. बैठकीत शैक्षणिक धोरणांवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या चर्चेत भाग घेतला.

एनडीएने विविध राज्यांतील खासदारांचं एकूण १४ गटांमध्ये विभाजन केलं असून प्रत्येक गटामध्ये घटक पक्षांतील खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व गटांमधील समन्वय आणि संवाद सुरळीत राहावा यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक अधिवेशन सत्राच्या वेळी ते या गटांतील सदस्यांना एकत्र बोलावून संवाद साधतात, खासदारांच्या समस्या जाणून घेतात आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करतात.

या बैठकीत भारतीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनइपी) दिशा, त्यातील संधी आणि संभाव्य त्रुटी यावर सखोल चर्चा झाली. शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न राहता त्यातील इतर घटकांनाही प्रोत्साहन देणारं असावं, यावर भर देण्यात आला.

खासदारांनी आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक अडचणी, पायाभूत सुविधांची कमतरता, शिक्षकांची उपलब्धता, डिजिटल शिक्षणातील अडथळे यांसारख्या मुद्द्यांवर आपले अनुभव मांडले. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले आणि त्या समस्यांवर केंद्र सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, याची माहिती दिली.

या बैठकीमुळे केवळ धोरणात्मक चर्चा झाली नाही, तर एकमेकांचे अनुभव आणि दृष्टिकोन समजून घेण्याची संधीही मिळाली. अशा प्रकारच्या बैठकीमुळे लोकशाहीची प्रक्रिया अधिक बळकट होते आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होते, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.