१३५ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला जीवदान

सिद्धिविनायक रुग्णालयाची कामगिरी

ठाणे: “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय ठाण्यातील सिद्धिविनायक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे पुन्हा एकदा आला आहे. पुणे येथील रहिवासी रेश्मा भुजबळ (३४) या जी.बी.एस. (Guillain-Barré Syndrome) या अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. १३५ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या या रुग्णास रुग्णालय आणि डॉ. अमोल गित्ते यांच्या संपूर्ण टीममुळे जीवदान मिळाले आहे.

अतिशय गंभीर अवस्थेत, श्वास पूर्णतः बंद पडलेला असताना आणि मेंदू कार्यरत असतानाच व्हेंटिलेटरची तातडीची गरज भासणाऱ्या रेश्मा भुजबळ या रुग्णास सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या अत्यंत उत्कृष्ट उपचारांमुळे, मानसिक आधार देणाऱ्या नर्सिंग स्टाफमुळे तसेच, आपुलकीची तसेच भावनिक आधार देणाऱ्या संपूर्ण टीममुळे रेश्मा भुजबळ तब्बल १३५ दिवस व्हेंटिलेटरवर असतानाही कोणतेही कॉम्प्लिकेशन न होता सुरक्षितपणे या गंभीर आजारातून बाहेर आल्या.

आज रेश्मा भुजबळ स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. गुरुवारी त्यांना सिद्धिविनायक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमकडून डिस्चार्ज देण्यात आला. या क्षणी रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण रुग्णालयातील स्टाफ यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. उत्कृष्ट तज्ञ डॉक्टर्स आणि निष्णात आयसीयू स्टाफ तसेच संवेदनशीलपणा जपत उपचार मिळाल्यामुळेच सिद्धिविनायक रुग्णालयाला अशा अवघड केसेसमध्ये यश मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

रुग्ण रेश्मा भुजबळ म्हणाल्या, ‘मी श्वास घेणं जणू विसरूनच गेले होते. पण सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील आयसीयूच्या सर्व डॉक्टरांनी आणि संपूर्ण स्टाफने मला जो मानसिक आधार दिला, माझ्यावर जे उपचार केले, त्यामुळं मी पुन्हा श्वास घ्यायला शिकले. व्हेंटिलेटरवरून बाहेर आले आणि आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या चिमुकलीला मी पुन्हा भेटू शकेन की नाही, अशीही आशा मला उरली नव्हती. पण आज मी माझ्या लेकराला भेटले आहे. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत.
आज मी माझ्या कुटुंबासोबत माझं पुढचं आयुष्य जगू शकते, हे फक्त आणि फक्त सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे शक्य झालं आहे.

या रुग्णाबाबत माहिती देताना डॉ. अमोल गित्ते म्हणाले की, “ही केस अतिशय किचकट आणि कॉम्प्लिकेटेड होती. एवढ्या दीर्घ कालावधीसाठी आयसीयूमध्ये असताना, तब्बल १३५ दिवस व्हेंटिलेटरवर असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन न होता, ना बेडसोर झाले, ना निमोनिया झाला, ना व्हेंटिलेटर-अक्वायर्ड इन्फेक्शन झाले. अशा स्थितीत आम्ही या रुग्णाला या क्रिटिकल अवस्थेमधून सुरक्षितपणे बाहेर काढू शकलो. याचं खरं श्रेय सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या आयसीयूच्या संपूर्ण टीमला जातं. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक स्टाफने अत्यंत समर्पितपणे काम केलं. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेला मानसिक आधारही खूप महत्त्वाचा ठरला.