निवडणूक आयोगाने लोकशाहीचे वाटोळे केले

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची टीका

ठाणे: प्रशासकीय यंत्रणेवर सरकारचा प्रचंड दबाव पाहता यापुढील निवडणुका सत्ताधार्‍यांनीच घ्याव्यात. म्हणजे निवडणूक आयोगाचा खर्च वाचेल, असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. सध्याचे वातावरण पाहता निवडणूक आयोगासाठी शब्द नाहीत. त्यांनी लोकशाहीचे वाटोळे केले असल्याची संतप्त प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. मुंब्य्रातील काही केंद्रांमध्ये उमेदवारांचे बॅनर लावल्याचा प्रकार घडला. त्यात ठाण्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद होणे, करंट लागणे असे अनुभव आले. याविषयी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी लोकशाहीची ही अखेरची घटीका असल्याचे सांगितले. मतदान केंद्राच्या शंभर मिटर परिघात कोणत्याही राजकीय बॅनरबाजीला मनाई असते. पण येथील निवडणूक अधिकार्‍यांनी ही खास परवानगी कोणत्या आधारे दिली हे आयोगाने तपासावे. खरे तर निवडणूक आयोग सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावर काम करत असून या देशाच्या लोकशाही आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची लक्तरे निघत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. यापुढे लोकं मतदानाला येणार नाही. कारण लोकशाही जिवंत राहिलेली नाही. पोलिसांवर दबाव, निवडणूक आयोग ताब्यात घेतले आहे. सर्व प्रक्रियेचे बारा वाजले आहेत. त्यामुळे यापुढे निवडणुका घेऊ नका, तुम्ही थेट निकाल जाहिर करा. निवडणुकांबाबत फार काही आशा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.