नवी मुंबई: नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)ने मोठा ऑपरेशनल टप्पा गाठला आहे, जेथे व्यावसायिक कार्यसंचालनांना सुरूवात केल्याच्या पहिल्या १९ दिवसांमध्ये एक लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. यामधून प्रवाशांची मोठी पसंती आणि प्रवास मागणीमधील स्थिर वाढ दिसून येते.
१२ जानेवारी २०२६ पर्यंत एनएमआयएने एकूण एक लाख ९,९१७ प्रवाशांची हाताळणी केली, ज्यामध्ये ५५,९३४ प्रवाशांनी आगमन केले, तर ५३,९८३ प्रवाशांनी प्रस्थान केले. एअरपोर्टने १० जानेवारी २०२६ रोजी सर्वाधिक व्यस्त दिवसाची नोंद केली, जेथे एका दिवसामध्ये ७,३४५ प्रवाशांची हाताळणी करण्यात आली. या कालावधीदरम्यान एनएमआयएने ७३४ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्सचे (एटीएम) व्यवस्थापन केले, ज्यामध्ये ३२ जनरल एव्हिएशन एटीएमचा समावेश होता. यामधून नियोजित व जनरल एव्हिएशन ऑपरेशन्समध्ये वाढता वापर दिसून येतो. एकूण ४०,२६० आगमन बॅग्ज आणि ३८,७७४ प्रस्थान बॅग्ज प्रोसेस करण्यात आल्या, यामधून सामानाची कार्यक्षमपणे हाताळणी करण्याची क्षमता दिसून येते, ज्यामागे प्रवाशांना अधिक कॅम्फर्ट देण्याचा मनसुबा आहे.
मालवाहतूकीसंदर्भात एनएमआयएने २२.२१ टन कार्गोची हाताळणी केली, यामधून विमानतळाचा सुरूवातीपासून प्रवासी व मालवाहतूक कार्यसंचालनांप्रती एकीकृत दृष्टिकोन दिसून येतो. कनेक्टीव्हीटीसंदर्भात दिल्ली, गोवा व बेंगळुरू प्रमुख क्षेत्रे ठरली.
आधुनिक पायाभूत सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेवर फोकससह एनएमआयए टप्प्याटप्प्याने सेवा वाढवत आहे, तसेच सुरक्षितता, सेवा दर्जा आणि प्रवाशांना उत्साहवर्धक प्रवास अनुभव देण्याचे उच्च मानक राखत आहे.