ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिधावाटप कार्यालय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाना यश

ठाणे: १४६ ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नव्याने शिधावाटप कार्यालयाची निर्मिती करण्याचा शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना शिधापत्रिकेच्या कामांकरिता हक्काचे शिधावाटप कार्यालय लवकरच मिळाणार आहे.

१४६ ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये ठाणे व मीरा-भाईंदर या दोन महापालिका येतात. ठाणे शहराची लोकसंख्या अंदाजे २२ लाखाच्या आसपास तर मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या अंदाजे १५ लाखांच्या आसपास आहे. यामध्ये अत्यल्प, मध्यम तसेच अल्प उत्पन्न गटातील लोकांचा समावेश असून त्यापैकी अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच केशरी व पिवळ्या शिधापत्रक धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील दारिद्रय रेषेखालील व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिकांच्या आधारे शिधा देण्यात येतो.

ठाणे व मीरा-भाईंदर शहराचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे तेथे नविन गृहसंकुलांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहराची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे नविन शिधापत्रिका बनविणे, शिधापत्रिकेमध्ये दुरूस्ती करून शिधापत्रिकेमधून नाव कमी करणे व नाव वाढवणे तसेच अनेक ग्राहकांचे शिधापत्रिका बंद झाल्यामुळे धान्य न मिळणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वैद्यकिय अथवा विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याामुळे ते पुन्हा सुरू करण्याकरिता ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. ही सर्व कामे करण्याकरिता ठाणे शहरात एक तर मीरा-भाईंदर शहरात एक शिधावाटप कार्यालय असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होत असून कामांना अनेक दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यावर उपाय योजना करण्यासाठी सर्व शिधावाटप कार्यालये डिजीटलायजेशन करणे, तसेच लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने सक्षम महिला बचत गट व विविध कार्यकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये शिधावाटप दुकानांची संख्या वाढविणे व दलाल मंडळींवर चाप बसविणे याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन २०२४ मध्ये स्थानिक आमदार या नात्याने औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेचे लक्ष वेधले होते.

त्याची दखल घेऊन शासनातर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ३६ फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील ३५ अ.शि.वा. दुकाने, ४१ फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील १४ अ.शि.वा. दुकाने व ४१ फ भाईंदर कार्यालय क्षेत्रातील ३४ अ.शि.वा. दुकाने असे एकूण ८३ अ.शि.वा. दुकानांसाठी नविन शिधावाटप कार्यालयाची निर्मिती करण्याचे शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आले असल्याने नागरिकांच्या व शि.प. धारकांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी जागेवर (अंदाजे ३००० ते ४००० चौ.फुटाचे) शिधावाटप कार्यालय उभारण्यात येणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.