मतदार याद्यांत घोळ

मनसे कार्यकर्त्यांचा राडा

ठाणे: कोणतीही चौकशी न करता मतदारांची नावे काढून टाकण्यात आली तर काही नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचा आरोप करत कळवा-विटावा येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयात राडा केला. मनसेचे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज निवडणूक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न देता आल्याने मनसैनिकांनी गोंधळ घातला.

विटावा गणपती पाडा प्रभाग क्र.२४ मध्ये मतदारांची नावे वगळण्यात आली होती. काही नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली होती. याबाबत मनसेकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई गेल्या महिनाभरात करण्यात आली नाही, शिवाय संबंधित अधिकारीही जागेवर उपलब्ध होत नव्हते. आज आचारसंहिता लागू झाली तरीही अधिकारी जागेवर नव्हते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला, अशी माहिती सुशांत सूर्यराव यांनी दिली.

निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याचबरोबर संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती. त्यामुळे विधानसभा मतदार संघाबाबत येणाऱ्या काळात मनसे कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही सूर्यराव यांनी सांगितले.