ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथील खाडीकिनारी व्ह्यूइंग टॉवर, कॉन्व्हेंशन सेंटर, कोलशेत येथे टाऊन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय तसेच ठाणे आंतरराष्ट्रीय मेट्रो जोडणी आदी विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा समावेश असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आंतरराष्ट्रीय किर्तीचे आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

ठाणे शहरातील कासारवडवली खाडीकिनारी येथील 50 एकर जागेत मंगल कलशाच्या संकल्पनेनुसार 260 मीटर उंचीचा देशातील सर्वात मोठा टॉवर आयफेल टॉवरच्या धर्तीवर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे आयफेल टॉवरची उंची ही 300 मीटर आहे. याठिकाणी व्ह्यूइंग टॉवर, कॉन्व्हेंशन सेंटर, यांचा समावेश असणार आहे. हे काम हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले आहे.

कोलशेत येथे 25 एकर जागेवर बीओटी तत्वावर टाऊन पार्क उभारण्यात येत आहे. या टाऊनपार्कमध्ये आगरी कोळी संग्रहालय, विज्ञान सेंटर, मत्सालय आणि क्रीडासंकुल यांचा समावेश असणार आहे. याची वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी तळ अधिक एक मजली एलिव्हेटेड उद्यानांचा समावेश आहे.

कोलशेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲडव्हेंचर पार्क 25 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. कोलशेत येथे 12.5 एकर जागेत पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी राज्य शासनाकडून 10 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2036 च्या ऑलिम्पिकच्या तयारीचा भाग म्हणून 50 एकर जागेत स्पोर्ट्स अरेना उभारण्यात येणार आहे. तर 25 एकर जागेत म्युझिकल कॉन्सर्ट तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणेकरांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी ठाण्यात मेट्रो सेवा लवकरच सुरू होत आहे. या मेट्रो सेवेला म्हातार्डी बुलेट ट्रेन स्टेशन, दिवा, मुंब्रा, कळवा हे मार्ग जोडले जाणार आहेत. एकूण 9.8 कि.मी.चा प्रवासाचा मार्ग असणार आहे. तर म्हातार्डी ते कोपरमार्गे डोंबिवली 4.1 कि.मी आणि म्हातर्डी ते तळोजा मेट्रो लाइन 12 शी जोडणारा- 3.2 कि.मी चा हा मार्ग असणार आहे. यासाठी डीपीआर महामेट्रो तयार करत आहे.

एकूणच ठाणेकरांना जास्तीत जास्त मुलभूत सोईसुविधा आणि मनोरंजनात्मक साधने उपलब्ध व्हावीत या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.