भारताला महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशकडून एकमेव पराभव 2023 मध्ये मिळाला होता. त्या वेळी ‘वुमन इन ब्लू’ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौर्यावर गेल्या होत्या. मालिकेचा निकाल 1-1 असा निरस वाटू शकतो, पण ही मालिका काही केवळ आकड्यांची नव्हती. तणाव, नाट्य आणि चुरस याने भरलेली ही मालिका होती. विशेषत: जेव्हा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला बाद दिल्यानंतर तिने व्यक्त केलेला संताप सर्वांच्या लक्षात राहिला. तिची पंचांवर केलेली टीका आणि सामन्यानंतर केलेल्या हावभाव आजही ताजे आहेत.
आता 2025 आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाकडे वळू या. रविवारी नवी मुंबईत पुन्हा एकदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. मात्र, यावेळी चित्र पूर्णपणे वेगळे आहे. बांगलादेश आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे, तर दोन वेळा अंतिम फेरी गाठलेल्या भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
गुरुवारी त्याच मैदानावर होणाऱ्या उपांत्य फेरीत विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वी, बांगलादेशविरुद्धचा सामना भारतासाठी चुका सुधारण्याची शेवटची संधी ठरणार आहे. सहा सामन्यांनंतरही भारतीय संघाचे प्लेइंग XI अजून स्थिर झालेले नाही.
सर्वात मोठी चिंता म्हणजे सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाची कमतरता. तसेच, संघ व्यवस्थापनासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा आहे — न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक खेळी केलेल्या जेमिमा रॉड्रिग्जला नंबर तीनवर कायम ठेवायचे का, की त्या स्थानावर आधी सहा पैकी पाच सामन्यांत खेळलेल्या हरलीन देओलकडे पुन्हा वळायचे? जर रॉड्रिग्ज नंबर तीनवर कायम ठेवले, तर अमनजोत कौरला हरलीनच्या जागी संघात स्थान देऊन सहाव्या गोलंदाजाचा पर्याय म्हणून वापरता येईल. तसेच अमनजोतकडे कोणत्ययी क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
या गोष्टी बाहेरून किरकोळ वाटू शकतात, पण अनिश्चित प्लेइंग XI चा फटका भारताला उपांत्य फेरीत बसू शकतो. इतर तीन उपांत्य फेरीतील संघ — ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपले संघ संयोजन प्रभावी राखले असून, साखळी सामन्यांत भारताच्या कमतरता उघड केल्या.
बांगलादेशसारख्या तुलनेने कमकुवत संघाविरुद्धचा सामना भारताला त्यांच्या ताकदीचे आणि कमकुवतींचे पूर्ण चित्र देणार नाही, पण तो रणनिती सुधारण्यासाठी, प्लेइंग XI निश्चित करण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.
भारताकडे गमावण्यासारखे बरेच काही असले तरी, केवळ एका विजयासह स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेशकडेही अभिमानाने विश्वचषकाला निरोप देण्याची संधी आहे. विशेषतः त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि चार वेळा विजेत्या इंग्लंडविरुद्ध दाखवलेली अप्रतिम खेळी त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे आहेत.
आमने-सामने
एकूण: भारत – 6, बांगलादेश – 1
भारतात: भारत – 3, बांगलादेश – 0
विश्वचषकात: भारत – 1, बांगलादेश – 0
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: भारत – 3, बांगलादेश – 7
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 26 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार