शहापुरात तीन हजार हेक्टर शेती पाण्याखाली

परतीच्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान

शहापूर: परतीच्या पावसाने शहापूर तालुक्यासह आसपासच्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कापणीस आलेली भात पिके पाण्यात बुडाली. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे दाणे कुजणे सुरू झाले आहे.

शेतकरी वर्गाने कष्टाने उभे केलेले पीक आता हातातून जाताना दिसत आहे. काही ठिकाणी पावसाबरोबर वाऱ्याचा जोर असल्याने पिके आडवी झाली असून उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. विशेषतः नदीकाठच्या नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील डोळखांब, किन्हवली, वासिंद, नडगाव, लेनाड, खर्डी परिसरातील शेतकऱ्यांचे तीन हजार हेक्टरवरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेली, पुढे जगायचं कसं, अशी उद्विग्नता शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचे आवाहन केले असून, पाणी ओसरल्यानंतर तत्काळ पीक बचाव उपाययोजना करण्यास सांगितले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अजूनही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे.काही अडचण असेल तर स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी संपर्क साधावा.तसेच भातपीक कापताना हवामान खात्याचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावीत, अशा सूचना परमेश्वर कासुले, तहसिलदार शहापूर यांनी केल्या आहेत.