नवी मुंबई मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई: देशात आणि राज्यात मतदार याद्यांच्या घोळाबाबत आरोपांची राळ उठवली जात असताना बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन बोगस मतदार नोंदणी केली असा गौप्यस्फोट केला आहे. या आरोपाची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनसेच्या वतीने नवी मुंबई पोलिस आयुक्तांना भेटून केली आहे.
बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी १८ ऑक्टोबर व २० ऑक्टोबर २०२५ रोजी विविध प्रतिष्ठित प्रसार माध्यमांशी बोलताना नवी मुंबईत निवडणूक आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदार यांची नावनोंदणी करतात, असा गंभीर आरोप केला आहे. मुळातच बेलापूर विधानसभेत साधारण १५ हजार दुबार नावे व १८ हजार बोगस नावे असल्याचे पुराव्यासहित निवेदन मनसेतर्फे गजानन काळे यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी बेलापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे दिसून येते. यात भर म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारीच पैसे घेऊन अशी नावे नोंदवतात असा गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य या संविधानिक पदावर असणारी व्यक्ती सबळ पुराव्याशिवाय असे आरोप करणार नाही. तरी याची दखल घेऊन ते कोण भ्रष्ट अधिकारी निवडणूक आयोगात आहेत यांची नावे व पुरावे मंदा म्हात्रे यांच्याकडून घ्यावी, अशी मागणी गजानन काळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली. कर्नाटक राज्यात प्रत्येकी ८० रुपये घेऊन बोगस नावे टाकण्यात आल्याचे पुरावे एसआयटी चौकशीत समोर आले. नवी मुंबईत सुद्धा अशा प्रकारे गुन्हा नोंदवल्यास पुढे चौकशीत अशा बऱ्याच बाबी समोर येऊ शकतात असे गजानन काळे काळे यांनी पोलिस आयुक्त यांना सांगितले.