प्रारूप प्रभाग रचने संदर्भात २७ गावांतून ३६४२ हरकती

सर्वपक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती जाणार राज्य निवडणूक आयोगात

कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वपक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेला २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क समितीने विरोध केला आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ३६४२ हरकती २७ गावातून दाखल झाल्या आहेत. जाणीवपूर्वक या हरकती व २७ गावातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क समितीने केला आहे. समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, मधुकर माळी, रतन पाटील, रामचंद्र पाटील इतर सर्व संघर्ष समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने २७ गावांची याचिका दाखल करून घेतली आहे. तर आता २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क समितीने राज्य निवडणूक आयोगाची वेळ मागितली आहे. २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दाखल केलेल्या याचिकेबाबत तारखा जवळ येत असून आता न्यायालयाने सर्व प्रतिवादींना आपापले म्हणणे मांडण्याकरिता वेळ दिलेली आहे. प्रकरणातील सर्व प्रतिवादींना नोटिस बजावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाकडून सुरू झाले आहे. तसेच महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ३६४२ हरकती २७ गावातून दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकती जाणीवपूर्वक व २७ गावातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत केला गेला आहे, असा आरोप समितीकडून होत आहे.