ओवळ्यातील ‘ट्रिनिटी’चा वनवास; बिल्डरला मुदत, अन्यथा स्वयंपुनर्विकास…

आ. संजय केळकर यांनी विकासकाला दिला इशारा..

ओवळा परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचे बांधकाम १२ वर्षे पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलेले नाही. त्यामुळे सुमारे १५० कुटुंबे ९०टक्के पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे. आमदार संजय केळकर यांनी रविवारी अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे हे देखील उपस्थित होते.

याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले की या इमारतीत सुमारे १५० कुटुंबे राहायला येणार असून त्यांनी ९० टक्के रक्कम विकासाकडे भरली आहे. मात्र १२ वर्षे उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी आम्ही या कुटुंबांच्या पाठीशी असून विकासकाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. त्या वेळेत बांधकाम पूर्ण झाले नाही तर पोलिसांच्या मदतीने विकासकाला तुरुंगात खडी फोडायला लावू आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अवलंबू, असे श्री. केळकर म्हणाले.

आमदार श्री. केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा केला. लवकरच आम्हाला आमची घरे मिळतील, असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधीने व्यक्त केला.