नौपाडा-कोपरीत प्रभागात समान ताकद
आनंद कांबळे/ठाणे
भारतीय जनता पक्षाची पकड असलेल्या नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिंदे सेनेसह इतर पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे. या प्रभाग समितीमधील प्रभाग रचनेत कोणत्याही प्रकारचा बदल नसल्याने येथे महायुतीमध्ये बिघाड झाल्यास भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.
नौपाडा प्रभाग समितीमध्ये प्रभाग क्र. १९, २० २१, २२ आणि २३ जुने ठाणे, नौपाडा, खारटन रोड, महागिरी कोळीवाडा, विष्णू नगर, भास्कर कॉलनी, हरिनिवास या भागाचा समावेश आहे. या प्रभाग समितीमध्ये कोपरी येथील सिंधी कॉलनी, कोळीवाडा पूर्व भाग, अष्टविनायक चौक आनंदनगर, कशिश पार्क भाग समविष्ट करून नौपाडा-कोपरी अशी प्रभाग समिती त्यावेळी करण्यात आली होती. कोपरीमधील सात नगरसेवकांच्या बळावर नौपाडा-कोपरी प्रभाग समिती सेनेने त्यांच्या ताब्यात ठेवली होती. या प्रभाग समितीमध्ये सेनेचे नऊ आणि भाजपचे सात सदस्य आहेत. त्यामुळे २०१७ ते २०२२पर्यंत या प्रभाग समितीवर सेनेची सत्ता होती.
सुमारे अडीच ते तीन लाख मतदार असलेला हा प्रभाग सुशिक्षित मतदारांचा असून भाजपाला मानणारा सुशिक्षित मतदार तसेच व्यापारी वर्ग या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्व भागात मात्र सेनेची ताकद असून भाजपाचे भरत चव्हाण हे त्यांना कडवी लढत देत आले आहेत. ही प्रभाग समिती ठाणे आणि कोपरी-पाचपाखाडी या दोन विधानसभा मतदारसंघात मोडत असून ठाणे विधानसभा मतदार संघ भाजपाकडे तर कोपरी-पाचपाखाडी हा सेनेकडे आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची ताकद असून काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचा जास्त प्रभाव नाही, त्यामुळे अगामी महापालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि शिंदे गट या दोन पक्षांचीच लढत येथे पाहण्यासाठी मिळणार आहे.
या प्रभाग समितीमध्ये दिग्गज नेते वास्तव्य करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, मनसे नेते अविनाश जाधव या सर्वजणांची कसोटी या निवडणुकीत लागणार असली तरी नौपाडा भाजपा राखणार कि शिंदे सेना काबीज करणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.