उल्हासनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, उल्हासनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याला विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठी झटापट झाली.
उल्हासनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत, कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखले. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामना खेळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनात उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, शहर प्रमुख कुलदीप सिंह, राधाचरण करोतिया,उपशहर प्रमुख राजू माने, राजन वायकर,भगवान मोहिते, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, युवा सेनेचे शहर प्रमुख महेश फुदे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तसेच मनसेचे सचिन कदम प्रदेश उपाध्यक्ष, बंडू देशमुख जिल्हाध्यक्ष, प्रदीप गोडसे उपजिल्हाध्यक्ष, दिलीप थोरात जिल्हा संघटक, संजय घुगे शहराध्यक्ष, सचिन बेंडके, उपशहर अध्यक्ष मुकेश शेठ पल आणि रवी पाल, सागर चव्हाण, अध्यक्ष रस्ते आस्थापनाचे मैनुद्दीन शेख अक्षय धोत्रे कैलास घोरपडे हितेश मेहरा प्रशांत संगाळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.