नागरी समस्या गणेशोत्सवापूर्वी सोडवा, अन्यथा आंदोलन

अंबरनाथ शिवसेनेचा नगरपालिकेला इशारा

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये नागरी सुविधांची समस्या बिकट असून गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली कराव्यात, अन्यथा नगरपालिकेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला.

अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून नागरिकांत असंतोषाची भावना पसरली आहे. नागरिकांच्या तक्रारी येत असून शहरप्रमुख वाळेकर यांनी आज मंगळवारी (29 ) रोजी नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली आणि जाब विचारला.

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात शिवमंदिर परिसर सुशोभीकरणसारखी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत, पण गल्लीबोळातील रस्ते, स्वच्छतागृहे, पथदिवे सफाई यासारख्या कामांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याबद्दल शहरप्रमुख वाळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात नव्याने आलेले अधिकारी शहरात फिरत नसल्याने समस्यांची त्यांना जाण नाही, पुढील महिन्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे, त्यापूर्वी शहरातील नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर कराव्यात अन्यथा पालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री.वाळेकर यांनी दिला. नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी गायकवाड यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची त्यांनी माहिती दिली.

माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक ॲड. निखील वाळेकर, पद्माकर दिघे, प्रकाश डावरे, ॲड. संदीप भराडे, बाळा मालुसरे, बाळा गायकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी गायकवाड यांच्या समवेत पालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी गायकवाड यांनी दिल्याची माहिती शहरप्रमुख वाळेकर यांनी दिली.