टक्केवारीच्या नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले

सॅटिस पाहणी दरम्यान राजन विचारे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

ठाणे: नवीन ठाणे स्टेशन, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला.

सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सॅटिस २ या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. श्री.विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. सत्तेतील लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली.

पाच गर्डर टाकून त्यावर स्टील काँक्रीट पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिले आहे.

प्रकल्पाला सण २०१८ साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटी ला मान्यता मिळाली. दिल्लीच्या आयआरडीसी विभागाकडूनही मंजुरी मिळवून घेतली. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले, अशी माहिती श्री.विचारे यांनी दिली.