जिल्हा अजिंक्यपदासाठी झुंजणार एक हजारहून अधिक बॅडमिंटनपटू

३८व्या ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे: ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित ३८व्या जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन आज खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल, दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे येथे ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. यंदाची स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मैलाचा दगड ठरली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून १००० हून अधिक खेळाडूंनी नोंद करत स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

या भव्य उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याच्या ज्येष्ठ पत्रकार, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. ‘ठाणेवैभव’ या ठाणे शहराशी नाळ जोडलेल्या दैनिकाने नुकतीच ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, त्यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. श्री. बल्लाळ यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांना केवळ खेळात नव्हे, तर जीवनातही शिस्त, सातत्य आणि संघर्षाचे महत्व समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने युवा खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास संचारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॅब इंडिया प्रा. लि.चे संचालक श्रीराम भालेराव उपस्थित होते. ठाण्यातील बॅडमिंटनच्या विकासात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जाणवत आले आहे. केवळ आर्थिक पाठबळच नव्हे, तर खेळाडूंसाठी लागणाऱ्या सुविधा, स्पर्धांचे सशक्त आयोजन आणि प्रशिक्षक वर्गाला आवश्यक तांत्रिक सहाय्य यासाठी त्यांचे सहकार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या उपस्थितीने आयोजक व खेळाडूंना एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त झाला. यावेळी मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्तार प्रकल्पात विशेष योगदान दिल्याबद्दल विनोद धारप यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील बॅडमिंटन सुविधांचा विस्तार ही काळाची गरज बनली असून, या दिशेने वाटचाल करताना श्री.धारप यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.

स्पर्धेमध्ये ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटांमध्ये पुरुष व महिला गटांतील एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारांचे सामने पार पडणार आहेत. पहिल्याच दिवशी खेळाडूंचा जोश, आत्मविश्वास आणि जबरदस्त कौशल्य पाहायला मिळाले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणारे अनेक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या हंगामाची सुरुवात करत असून, नवोदितांना देखील स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी मिळत आहे.

या स्पर्धा ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, दररोज रंगतदार सामने आणि नव्या खेळाडूंचा उदय ठाण्यातील बॅडमिंटन संस्कृती समृद्ध करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा केवळ अजिंक्यतेपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती एक ठाण्यातील बॅडमिंटनच्या उज्ज्वल भविष्याची चळवळ बनली आहे.