पोलिसांकडून तपास सुरु
वसई: मंगळवारी सकाळी वसईच्या कलाम बीचवर एक मोठा संशयास्पद कंटेनर किनाऱ्यावर आला. या घटनेने किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. कंटेनर पाहून सर्वजण घाबरले.
वसई पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही स्थानिक नागरिकांना समुद्राच्या लाटांसोबत एक भला मोठा कंटेनर समुद्रकिनारी वाहून येत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समुद्रकिनारी कंटेनर वाहून आल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या कंटेनरबाबत कुतूहल निर्माण झाल्याने बघ्यांची देखील मोठी गर्दी समुद्रातून वाहून आलेला हा कंटेनर पाहण्यासाठी कळंब समुद्रकिनारी जमा झाल्याचे पहावयास मिळाले.
सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना कंटेनरजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी सुरक्षा वाढवली आहे आणि कंटेनरचा मूळ स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.
समुद्रकिनारी आढळून आलेला हा कंटेनर मालवाहू जहाजातून पडून समुद्राच्या लाटांमुळे कळंब समुद्रकिनारी वाहून आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रकिनारी आढळलेला हा भला मोठा कंटेनर कोणत्या कंपनीचा आहे? कुठून वाहून आला? नेमके याच्यात काय आहे? याबाबतचा तपास पोलिसांमार्फत सुरू आहे.