पंचांगकर्त दा. कृ. सोमण यांचा कानमंत्र
ठाणे: यावर्षी गुरुवार २४ जुलै रोजी आषाढ अमावास्या म्हणजे दिव्याची अमावास्या आहे. तर शुक्रवार २५ जुलैपासून शनिवार २३ ॲागस्टपर्यंत पवित्र श्रावणमास आहे. या काळात धार्मिक व्रत वैकल्यांबरोबरच अधिक व्रतेही करा, त्यामुळे मन शांत आणि निरोगी राहील, असा कानमंत्र पंचांगकर्त दा. कृ. सोमण यांनी दिला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्त दा. कृ. सोमण म्हणाले, गुरुवार २४ जुलै रोजी रात्री १२. ४१ पर्यंत आषाढ अमावास्या आहे. या दिवशी स्त्रिया घरातील दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळी घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. दीपपूजन केल्याने धन-धान्य व लक्ष्नी प्राप्त होते, अशी लोकांची श्रद्धा असते. प्राचीनकाळी विद्युत दिवे नव्हते. पावसाळ्यात घरात जास्त अंधार होतो, घरातील दिवे सुस्थितीत असावेत, त्यांची देखभाल केली जावी म्हणून कदाचित हे सांगण्यात आले असावे, असे मत श्री.सोमण यांनी व्यक्त केले.
शुक्रवार २५ जुलैपासून शनिवार २३ ॲागस्टपर्यंत पवित्र श्रावणमास आलेला आहे. श्रावण महिन्यात रविवारी आदित्य पूजन, सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारूती पूजन करण्याची प्रथा आहे. नवीन विवाह झालेल्या गृहिणी दर सोमवारी वेगवेगळी मूठभर धान्ये भगवान शंकराला वाहतात. नवीन घरात सासरी आलेल्या गृहिणीच्या हाताला धान्य दान देण्याची सवय व्हावी हा त्यामागचा हेतू असावा, असेही श्री.सोमण म्हणाले.
श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रते करण्याची प्रथा आहे. ही व्रते मनाचे आरोग्य उत्तम रहावे, संयम राखण्याची सवय व्हावी यासाठी सांगण्यात आलेली आहेत. आधुनिक काळात दा. कृ. सोमण यांनी वेगळी व्रते सांगितली आहेत. रविवारी निसर्गभ्रमण करायचे, सोमवारी मोबाईल वापरायचा नाही, मंगळवारी व्हाटस्ॲप पहायचे नाही. बुधवारी फेसबुक पहायचे नाही, गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवायचा, शुक्रवारी घराची स्वच्छता करायची आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करायचा ! असे केल्याने आपल्या मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील असा विश्वास श्री. सोमण यांनी व्यक्त केला.