दरवाजे उघडणार, सावधगिरीचा इशारा
राजेश जागरे/शहापूर
भातसा धरण क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे यंदा जुलै महिन्यातच ८५टक्के धरण भरले आहे. त्यामुळे उद्या-परवापर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडले जाणार आहे. पाण्याच्या या विसर्गाबाबत भातसा धरण व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचवले आहे. तसेच नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात यावा असे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
मंगळवारी दुपारी ३ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १३७. ५० मीटर एवढी वाढली होती. भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून धरणात येणाऱ्या संभाव्य पाण्यात वाढ होत आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जर असेच राहिले तर भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे दरवाजे येणाऱ्या २४ तासात उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. परिणामी भातसा धरणातून विसर्ग प्रवाहीत करण्याची दाट शक्यता आहे. तथापि भातसा धरणाच्या अधोबाजूस असलेल्या भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना व गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबतची सूचना देण्यात आली आहे. पुढील काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.