प्रेमाने बोला मराठी बोला…
ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मात्र अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असल्याचे दिसत आहे. नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दलचे प्रेम वाढावे यासाठी मायबोलीचा संदेश देणाऱ्या राख्या ठाण्यातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
प्रेमाने बोला मराठी बोला, जय महाराष्ट्र, मी मराठी शिकणार, आपण मराठी शिकूया, रुजवू मराठी, बोलु मराठी, मराठी भाषा गोड अशा आशयाचे संदेश या राख्यांवर कोरलेले आहेत. सध्या या राख्या नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत.
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण असून लाडक्या भावासाठी आगळी-वेगळी राखी घेण्यासाठी मुली-महिलांची लगबग सुरू झाली आहे. ठाण्यातील वामाक्षी राखी या ब्रँडने दरवर्षीप्रमाणे यंदाही आणलेल्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या रंगबिरंगी राख्यांनी लोकांचे मन जिंकले आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेली राखी, मराठी भाषा बोलू, मराठी शिकूया, कार्टून राखी, सिल्वर गोल्ड कस्टमायझ, लोंबा राखी, इव्हिल आय राखी, देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या फोटोंची राखी, शिव राजमुद्रा अशा अनेक आगळ्यावेगळ्या राख्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. एक रुपयापासून पाच हजार आणि त्याहून अधिक रुपये किमतीच्या राख्या उपलब्ध असून मागणीनुसार त्या बनवून देण्यात येतात. यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो असलेल्या राख्या नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आल्या आहेत.
१५ वर्षांपासून वामाक्षी राखी स्वतः राखी बनवत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या फोटोसह असलेली आगळीवेगळी राखी आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध केली होती. यंदा महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेचा वाद खूप वाढत असताना वामाक्षी राखीतर्फे जनजागृतीसाठी आगळ्यावेगळ्या राख्या बनवण्यात आल्या आहेत. या राख्यांच्या माध्यमातून अहिंसा परमो धर्म, हे आपले संस्कार, विसरून सर्व जुने वाद.. आता करा नवी सुरुवात, भाऊ करा हात पुढे.. वामाक्षी राखी सोबत शिकूया मराठी.. प्रेमाने बोलूया मराठी- सोबत रिझवूया मराठी.. गोड बोला.. जोरात बोला.. जय हिंदी जय महाराष्ट्र या संदेशामार्फत मराठी भाषेसंदर्भात नागरिकांच्या मनात प्रेम वाढव यासाठी वामाक्षी राखीचा हा उपक्रम राबवत असल्याचे वामाक्षी राखीचे सर्वेसर्वा विराज धनगर यांनी ‘ठाणेवैभव’ला माहिती देताना सांगितले.