ठेकेदाराची निर्दयी कुऱ्हाड बसली १०० पक्ष्यांच्या वर्मी!

* झाडाच्या छाटणीत घरटी तुटली, अंडी फुटली, पक्षी मित्रांमध्ये हळहळ
* ठेकेदार आणि गृहसंकुलाविरुद्ध गुन्हा दाखल होणार

ठाणे : झाडावर पक्ष्यांची घरटी किंवा पक्ष्यांचे वास्तव्य असल्यास वृक्षाची छाटणी करण्यास मनाई असते. मात्र घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत बेजबाबदारपणे वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या छाटणीत झाडावरील घरटी खाली पडून सुमारे १०० पक्षी आणि पिल्लांचा मृत्यु झाला. काही घरट्यातील अंडी पडून ती फुटली. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमी अवस्थेत असलेल्या २० पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचविण्यात पक्षीमित्रांना यश आले.

घोडबंदर परिसरात मोठ-मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. हा परिसर निसर्गसंपन्न परिसर आहे. याठिकाणी वृक्षांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. याचमुळे निसर्गप्रेमी अनेक जण या भागात वास्तव्यास आले आहेत. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून अपघात होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरातील वृक्षांच्या छाटणीची मोहीम पावसाळ्यापुर्वी हाती घेण्यात आली होती. तर, पालिकेच्या सुचनेनुसार गृहसंकुलांच्या आवारातील वृक्ष फांद्यांची छाटणी संकुलामार्फतच करण्यात येते. अशाचप्रकारे घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यु झाल्याने पक्षीमित्रांमधून संताप व्यक्त होत आहे.

वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम संकुलाने एका खासगी ठेकेदाराला दिले होते. या ठेकेदारामार्फत वृक्ष छाटणीचे काम गुरुवारी दुपारी १च्या दरम्यान सुरू होते. या वृक्षांवर डोमकावळा आणि बगळा, चिमण्या या पक्ष्यांनी घरटी बांधली होती. यापैकी काही पक्ष्यांची पिल्ले घरट्यात होती. तर, काही पक्ष्यांची अंडी घरट्यात होती. वृक्षांच्या फांद्या छाटताना पक्ष्यांची घरटी खाली कोसळली. यात सुमारे १०० पिल्लांचा मृत्यु झाला. या परिसरातील रस्ता आणि गटारामध्ये मृत अवस्थेत पिल्ले पडली होती. याबाबत काही नागरिकांनी ही माहिती आम्हाला दिली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती प्राणी पक्षी मित्र तसेच मायपलक्लब फाऊंडेशनच्या संचालक आदिती नायर आणि निशांत बांगेरा यांनी दिली. घटनास्थळी २०पेक्षा जास्त पक्षी आणि त्यांची पिल्ले जखमी अवस्थेत आढळून आली असून त्यांना दवाखान्यात नेऊन तिथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठिक आहे, असेही त्यांनी सांगितले. वन विभागाला देखिल या घटनेची माहिती दिली असून त्यांनी पंचनामा केला आहे जिओ टॅग करण्यात येत असून वन विभाग देखिल कारवाई करणार असे पक्षी प्रेमी निशांत बांगेरा यांनी दिली.

ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाचे केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संकुलामार्फत वृक्षांच्या फांद्यांची छाटणी सुरू असताना पक्षांची घरटी पडून त्यात पिल्लांचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकार गंभीर असल्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष्यांची घरटी, फळ, आणि पक्षी झाडावर असतील तर त्यांची छाटणी करण्यासाठी मनाई असते, परंतु या झाडावर पक्षी असतानाही वृक्ष छाटणी करणाऱ्या गृहसंकुलाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे केदार पाटील म्हणाले.

या पक्ष्यांच्या विष्ठेचा प्रचंड त्रास गृहसंकुलातील सदस्यांना होत होता, कबुतरांच्या विष्ठेने श्वसनाचा त्रास होतो, त्याचप्रमाणे हे पक्षी मासे घेऊन येत होते. पावसात मासे सडून त्याची दुर्गंधी येथे पसरत होती, अशी प्रतिक्रिया येथे राहणारे डॉ. विवेक वडके यांनी दिली.