वाहतूक कोंडी आणि खड्ड्याच्या कचाट्यात भिवंडी

भिवंडी: भिवंडी शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत तर काही ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे या रस्त्यावरून भिवंडीकरांना जाणे हलाखीचे झाले आहे. त्यातच खड्ड्याचा आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे शहराच्या चारही बाजुंना असलेल्या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे भिवंडीकरांच्या जीवाचे हाल सुरू आहेत.

या प्रमुख समस्यांकडे एकमेकांवर आरोप करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरवर्ग,व्यापारी आणि प्रवासी वर्गाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

भिवंडी शहराच्या बाहेर जाणारे भिवंडी-कल्याण,भिवंडी-ठाणे(बायपास माणकोली मार्ग), भिवंडी-ठाणे (कशेळीमार्ग), भिवंडी-पडघा-नाशिक (चावींद्रा मार्ग), भिवंडी-वसई (चिंचोटी मार्ग), भिवंडी-पारोळ (शेलारमार्ग), भिवंडी-वाडा (अम्बाडीमार्गे) हे भिवंडी शहरातून शहराबाहेर पाडण्यासाठी प्रमुख मार्ग असून या सर्व मार्गावर खड्डे झाले असून या मार्गावर दररोज नियमित वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गावर काही ना काही कामे सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गावरून नियमित नोकरदार आपापल्या कार्यालयात जाण्यासाठी दररोज प्रवास करीत आहेत. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते मात्र खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदारांना बारा-बारा तास काम करण्यासाठी अनेकांना या समस्यांमुळे २-४ तासांचा प्रवास दररोज करावा लागतो. तेच हाल व्यापारी आणि प्रवाश्यांचे हाल आहे. या मार्गावरून जाताना वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या खाजगी-सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतोच. त्याच प्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर परिणाम होऊन त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कार्यालय गाठण्यासाठी धावपळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कधी-कधी छोटे मोठे अपघात देखील होतात. अशा विविध दुष्परिणामांमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या बाबत ना राजकीय पुढारी,ना संबंधित शासकीय अधिकारी, ना ठेकेदार विचार करीत आहेत. या सर्व बाजूच्या मार्गाने म्हणजे जव्हार, पालघर-बोईसर, वाडा, पारोळ, वसई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, पडघा, नाशिक या दरम्यानच्या विविध गावातून सुमारे १० हजारापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी आपली नोकरी टिकविण्यासाठी दररोज हलाखीचा प्रवास करीत आहेत.

याबाबत भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप-अभियंता दत्तू गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. तर भिवंडीतील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओहोळ यांनी सांगितले कि, विविध योजनांतून सुरु झालेल्या रस्त्यांमधील वाहतूक ठाण्याच्या मार्गावर वाढली असून त्याचा परिणाम माणकोलीपुढील अर्धवट पुलामुळे होत आहे. या वाहतुकीला वेळेत पुढे जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळे वाहतूक कोंडी होते तर गोदामाकडे जाणारी वाहने वाहतुकीला अडथळा करतात. त्यामुळे ठाणे मार्गाकडे वाहतूक कोंडी होत आहे. खारीगाव नवीन पूल सुरु झाल्यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले.