ठाणे: हिंदीची सक्ती करणाऱ्या शाळांच्या विरोधात महाराष्ट्र नव निर्माण सेनेने एल्गार पुकारला असून शहरातील शाळांच्या परिसरात हिंदी सक्तीविरोधात बॅनर लावून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला इशारा दिला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या धोरणाला विरोध दर्शवला. राज्य सरकारने तीन भाषा सक्तीचे धोरण पाठीमागे घ्यावे अन्यथा मनसे खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शाळांमध्ये हिंदी शिकवणे सक्तीचे केले तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. त्यामुळे माय मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाने करू नये. हिंदी भाषा हा भाषेचा तिसरा पर्याय ठेऊ नये, असे आवाहन मनसेने शाळा प्रशासनाला केले आहे, तसा प्रयत्न केला तर मनसे खपवून घेणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे.