कल्याण : कल्याण-मुरबाड-नगर या राष्ट्रीय मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग शहाड पुलाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे शहाड पूल वाहनांसाठी खोळंबा मार्ग झाला आहे.
शहाड उड्डाणपुलावर रस्त्यावर खड्डे पडल्याने याचा फटका वाहतूकीवर होत असून वाहने खड्ड्यांतून चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
कल्याणहून मुरबाड-नगरकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील शहाड उड्डाणपूल हा महत्त्वाचा दुवा आहे. येथील रेल्वे लाईनवर हा पूल बांधण्यात आला असून दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण होते. यंदाही तेच चित्र दिसत असून पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहता संभाव्य अपघाताला निमंत्रण दिसून येत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या ठाणे उपविभागाच्या उपअभियंत्यांनी वेळीच पाहणी करून खड्डे प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अन्यथा पुढील आणखी काही दिवस खड्ड्यांसोबतच वाहतूक कोंडीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी फोन घेतला गेला नाही.