एसटीच्या श्रीमंत मार्गांवर धावणार खासगी बस

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध निर्णय

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडेतत्त्वावरील खासगी बस चालवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. व्हॉल्वो कंपनीला एसटीचा लोगो, उत्पन्न देणारे मार्ग, तिकीट सेवा, एसटीचे आगार, थांबे प्रदान करण्यात येतील. त्या बदल्यात खासगी कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी एसटी महामंडळाला १० ते १२ टक्के हिस्सा देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. एसटीच्या ताफ्यात ३० शयनयान आणि ७० आसनी अशा १०० व्हॉल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटी महामंडळाची आर्थिक गणिते बिघडली असून, एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत एसटीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. प्रतिदिन ३४ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ३१.८० कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ पार पडले. तरीही त्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश आलेले नाही. उन्हाळी हंगामात विशेष कामगिरी झाली नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिती आहे. तसेच प्रवाशांनीही एसटीला पाठ दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एसटीचे जास्त उत्पन्न देणारे मार्ग व्हॉल्वो कंपनीद्वारे ठरवण्यात येतील. त्या मार्गावर या बस धावतील. या बसचा देखभाल खर्च, चालक, वाहक व इतर कर्मचारी खासगी कंपनी करेल. तर, एसटी महामंडळाद्वारे पायाभूत सुविधा, तिकिट सुविधा आणि एसटीचा लोगो दिला जाईल. त्यामुळे एसटीचा प्रवासी मोठ्या विश्वासाने या खासगी बसमधून प्रवास करेल. या बदल्यात कंपनीकडून एसटी महामंडळाला महसूल मिळेल. तसेच प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर प्रवास होईल, असा दावा करण्यात येत आहे.

नुकताच व्हॉल्वो कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत एसटीच्या ताफ्यात ३० शयनयान आणि ७० आसनी बस घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या बस एसटीने विकत घ्यायच्या की भाडे तत्त्वावर चालवायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

जाहिरातींद्वारे १०० कोटी मिळणार
सध्या एसटी महामंडळाला जाहिरातीद्वारे सुमारे २३ कोटी रुपये मिळतात. परंतु, जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील दोन ते तीन जाहिरात कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार करून उत्पन्न वाढविण्याचा मानस आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पार्सलद्वारे उत्पन्न १०० कोटी रुपयांचे लक्ष्य
एसटी महामंडळाने पार्सलद्वारे मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पार्सल ठेवण्यासाठी पीपीपी तत्वावर वातानुकूलित आणि विनावातानुकूलित गोदामे उभारण्यात येणार आहेत. येत्या तीन ते चार वर्षांत १०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. सध्याच्या तुलनेत येत्या वर्षात उत्पन्नात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.