मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण कोकणपट्टीसह मुंबई व उपनगराला पाऊस झोडपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे असून अरबी समुद्रात कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे कोकणपट्टीसह मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे.
मुसळधार पावसामुळे पुढील 2-4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी भागात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, येत्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकुल वातावरण तयार झाले आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात सध्या नैऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, गोवा, कर्नाटक व केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. जे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. अशात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग 35-40 किमी तर काही ठिकाणी तो वेग 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मेघगर्जनांसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या (23 मे) रोजी रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट असून पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट आहे. शनिवार आणि रविवारी कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट आहे.