पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करणार; घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्धार
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५१ टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांहून जास्त झाली आहे. आता प्रामुख्याने मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत अशा छोटे नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झाली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत. तेथे आता नालेसफाईचे काम सुरू झाले असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा, असे निर्देश या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.
यंदा पावसाळ्यात ठाणे तुंबणार!
३१ मे डेडलाईनला काही दिवस बाकी; कामे अर्धवट
ठाणे : पावसाळा तोंडावर आला असून रस्त्याची आणि नालेसफाईची कामे अर्धवट स्थितीत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले तर याला प्रशासन जबाबदार असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचार यांनी केली आहे.
३१ मे च्या डेडलाईनला काही दिवस बाकी असून कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यातच अर्धे ठाणे खोदून ठेवले असून तलावांची झालेली दुरावस्था, कचऱ्याच्या समस्या, नालेसफाई समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर पाण्याखाली जाणार असून ठाणे महापालिकेच्या या कारभाराबाबत मा. खा. राजन विचारे ठामपा आयुक्तांवर चांगलेच घसरले.
तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरांतील तलावांच्या झालेल्या दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोलखोल यावेळी माजी खा. विचारे यांनी केली. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन कारभार सांभाळत आहे. आपल्याला वाटेल तसे काम अधिकारी करत आहेत. तसेच सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचे अंकुश राहिले नाही, अशी टीका त्यांनी केली.
गेल्या सहा महिन्यापासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करत होते. याचा नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करत आवडत्या ठेकेदारांची बिले काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील मासे मरत आहे . सिद्धेश्वर तलाव , ब्रम्हाळा तलाव, मदार्डे तलावातील मासे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मरत आहेत. पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्यास या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यामध्ये शिरल्यास अधिकाऱ्याला धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे.
शहरात केवळ ४५ टक्के नालेसफाई झाली असून उर्वरित 55% नालेसफाई कधी पूर्ण करणार असा सवाल विचारे यांनी केला. घोडबंदर पट्ट्यात अनेक ठिकाणी एमएमआरडीए अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. यांची मुदत ३१ मे पर्यंत पूर्ण होतील असे आयुक्तांनी सांगितले. कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणेची आहे. घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड खोदून ठेवले आहेत. त्याची कामे बाकी आहेत. यंदा घोडबंदर पाण्याखाली जाणार अशी भीती विचारे यांनी व्यक्त केली. पाणी तुंबले तर त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ही पत्राद्वारे केली आहे.