इमारतीचा स्लॅब कोसळून सहा ठार तर चार जखमी

कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी भागातील घटना

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील चार मजली सप्तशृंगी इमारतीतील स्लॅबचा काही भाग मंगळवारी कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील घडली.

घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे बचाव पथक आणि पोलीस प्रशासन बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. याबाबत अग्निशमन जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या आतील बाजूचा काही भाग दुसऱ्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत कोसळला असून त्यामध्ये काही लोक अडकले आहेत. बचावकार्य करतांना पथकाला चार जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अग्निशमन विभागाचे जवान अजूनही कोणी आत अडकले आहे का याचा तपास रात्री उशिरापर्यंत करीत होते.

या घटनेबाबत पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती आणि ती पावसाळ्यापूर्वी रिकामी करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. तसेच पावसाळ्यापूर्वी रिकामी करण्याची सूचनाही देण्यात आली होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास श्री सप्तशृंगी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, शिवसेना ऑफिसच्या मागे, चिकणीपाडा तिसगाव रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली. सोसायटीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब खाली तळमजऱ्यापर्यंत पडल्याने सदर इमारतीतील चार जखमी तर सहा रहिवाशांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये नमस्वी शेलार (2) रा रूम .नंबर 1, पहिला माळा, सप्तशृंगी बिल्डिंग, चिकणी पाडा कल्याण पूर्व, प्रमिला साहू (56) राहणार इंदिरानगर मुलुंड, सुनीता साहू (38), राहणार रूम नंबर 201, दुसरा माळा, सप्तशृंगी बिल्डिंग चिकणी पाडा कल्याण पूर्व, सुशीला गुजर (78), व्यंकट चव्हाण (42) आणि सुजाता वाडी (38) यांचा समावेश आहे.

जखमी विनायक पाधी (4), शर्विल शेलार (4) असे दोघे आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. निखिल खरात (26) हे चैतन्य हॉस्पिटल येथे तर अरुणा वीर हे अमेय हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.