ठाणे जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू
ठाणे: ठाणे जिल्ह्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून विविध शाखांमध्ये ११वी च्या प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील ४५४ महाविद्यालयांनी दरवाजे उघडे केले आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश सुरू झाल्याची माहिती दिली आहे.
अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५४ कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले दरवाजे उघडे केले आहेत. त्यामुळे
सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र, आधार कार्ड, जातीचे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी पालक सेतू कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. मात्र अकरावी प्रवेश प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर जिल्हा शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे जाहीर केले असून, त्यासंबंधीचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सोमवार 19 मे पासून विद्यार्थ्यांसाठी पोर्टल सुरू करण्यात आले असून 12 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर 14 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
फेरी क्र. एकचे वेळापत्रक
* १९-२० मे सराव सत्रविद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर
* २१ – २८ मे प्रत्यक्ष नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरणे (१ ते १० पर्यंत)
* ३० मे तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
* ३० मे-१ जून हरकती व दुरुस्ती प्रक्रिया
* ३ जून-अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
* ५ जून-गुणवत्तायादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी)
* ६ जून-वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध
* ६-१२ जून “Prcheoceed for Admission” पर्यायाद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे
* १४ जून- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर
* प्रथम पसंतीला प्रवेश अनिवार्य
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करणे आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणे अनिवार्य राहील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये गांभीर्याने सहभागी व्हावे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.