ठाणे बॅडमिंटन अकादमीचे राष्ट्रीय मानांकन
ठाणे: यंदा हैदराबाद येथे आयोजित योनेक्स सनराईस ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीचे काही निवडक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा अभिमान वाढवित आहेत. या स्पर्धेत देशभरातून निवडक आणि गुणी खेळाडू सहभागी झाले होते.
पुरुष सिंगल्स स्पर्धेत क्रिश देसाई यांनी प्रचंड प्रयत्न व कष्टाने कांस्यपदक पटकावले. पालघर जिल्ह्याचा रहिवासी असलेला क्रिश २०२३ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी आला आणि येथे त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेतील त्याचा प्रवास राऊंड ऑफ २५६ पासून सुरू झाला, ज्यामध्ये त्याने अनेक शक्तिशाली खेळाडूंवर मात केली. राष्ट्रीय गेम्स पदक विजेता आणि दुसऱ्या सीडेड कौशल धर्ममेहर याला तीन सेटमध्ये २१-१४, १६-२१, २१-१३ असा पराभव करून क्रिशने आपली ताकद सिद्ध केली आणि कांस्यपदक जिंकलं.
पुरुष दुहेरीत ठाणे बॅडमिंटन अकादमीची चमकदार जोडी दीप राम्भीया आणि प्रतीक रानडे यांनीही अखिल भारतीय स्तरावर राज्याचा अभिमान वाढवला आहे. प्रतीक इचलकरंजीचा असून, तो २०१२ पासून अकादमीचा अविभाज्य भाग आहे. दीप आणि प्रतीक यांनी क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या सीडेड जोडी सिद्धार्थ एलँगो व गौस शेख यांना तीन सेटमध्ये हरवून १६-२१, २१-१५, २१-१९ असा विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये त्यांनी नितीन कुमार व हर्ष राणाला २२-२०, १९-२१, २१-१४ या अवघड सामन्यात हरवले. अखेरच्या फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तरीही या यशस्वी जोडीने ठाणे आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढविला आहे.
दीप राम्भीया, जो राष्ट्रीय मिक्स्ड डबल्समध्ये भारताचा क्रमांक एकचा खेळाडू आहे आणि ज्याला महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे, तो अकादमीचा सध्याचा प्रमुख खेळाडू ठरला आहे. प्रतीक रानडेदेखील अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विजेतेपदांच्या मालक आहेत. या जोडीने ठाणे बॅडमिंटन अकादमीची एक नवी ओळख तयार केली आहे.
ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये लहानपणापासून प्रशिक्षण घेत असलेल्या आणि नव्याने सामील झालेल्या या खेळाडूंच्या यशामागे अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, ज्येष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, श्रीकांत भागवत, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, अमित गोडबोले, प्रसेनजीत शिरोडकर आणि एकेंद्र दर्जी यांच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत सतत त्यांचा दर्जा उंचावला आहे.