कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवार, १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसेच या प्रसंगी सुमित एल्को कंपनीच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केले.
या स्वच्छता अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन व वाहतुक याचबरोबर रस्ते सफाईकरीता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हे अभियान राबविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता. या अभियानांतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवणेकरीता २४७ कमांड कंट्रोल सेंटर, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचे निवारण करणेकरीता २४ तास कार्यरत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच पाच ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारणी करण्यासमवेतच प्राथमिक कचरा संकलनाकरीता पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणारी वाहने व चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पाकींग व्यवस्था उभारली गेेली आहे. तर कचरामुक्त रस्ता संकल्पने अंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी ३० टक्के रस्ते कचरामुक्त राहणेकरीता स्वतंत्र यंत्रणा, मृत जनावरांचे अवशेष व हरीत कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरीता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करीता अत्याधुनिक सोयीसुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर व रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा (कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने ) आहे. अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरात कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
कल्याण-डोंबिवली या दोन्हीही शहरांचा वेगाने विकास होतो आहे. येथील वाढती लोकसंख्या पाहता या शहरांची स्वच्छता ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे अभियान हाती घेण्यात असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच या अभियानात कार्यरत असणाऱ्या खासगी संस्थेने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करून घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे, विश्वनाथ भोईर, सुलभा गायकवाड, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, टाटाचे सुशील कुमार यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
टाटा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सात हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून त्यात रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजनस आणि ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कल्याण शहरातील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने १९७ कोटी रुपयांच्या निधीतून हे केंद्र उभे राहणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये केडीएमसी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप, कल्याण – टिटवाळा रिंग रोड मधील पात्र लाभार्थ्यांना, MUTP-3A कल्याण बदलापूर ३ री आणि ४थी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच MUTP-3A कल्याण गुड्स यार्ड उपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप करण्यात आले. तर टिटवाळा येथील उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबाळपाडा येथे अद्ययावत क्रिडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन आणि महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ ३ च्या दामिनी पथकाला १६ दुचाकी वाहन वाटप इत्यादी महत्वाच्या कार्यक्रम यावेळी पार पडले.