माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका केल्यानंतर होती चर्चेत
ढाका: प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली आहे. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहमान यांच्या ‘मुजीबः द मेकिंग ऑफ अ नेशन’ या बायोपिकमध्ये नुसरत फारियाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. मागच्या वर्षी जुलै महिन्यात शेख हसीना यांच्याविरोधात जनआंदोलन उसळले होते. यावेळी हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित एका प्रकरणात नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे.
३१ वर्षीय अभिनेत्री आज सकाळी थायलंडला जाण्यासाठी ढाकामधील शाहजहाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली असता तिला अटक करण्यात आले, असे वृत्त स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.
ढाका विमानतळावरील इमिग्रेशन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साली सरकारविरोधात छेडलेल्या जनआंदोलनादरम्यान हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नुसरतवर करण्यात आला होता. या आरोपाखाली तिला अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. २०२४ झालेल्या आंदोलनामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले होते.
इंडिया टुडेने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, अटक झाल्यानंतर नुसरत फारियाला ढाकामधील वातारा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यानंतर तिची रवानगी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात करण्यात येईल, असे वृत्त प्रथम आलो वृत्तपत्राने दिले आहे.
शेख हसीना यांची भूमिका साकारली होती
२०२३ साली आलेल्या ‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या चित्रपटात नुसरत फारियाने शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांनी केले होते. बांगलादेश आणि भारत यांच्या संयुक्त निर्मितीने हा चित्रपट निर्मित केला होता.
नुसरत फारियाने रेडिओ जॉकी आणि प्रेझेंटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१५ साली बांगलादेश-भारत यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘आशिकी: ट्रू लव्ह’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नुसरत फारियाने अनेक बांगलादेशी आणि भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये अनेक बंगाली चित्रपट आहेत. टेलिव्हिजन होस्टिंग आणि मॉडलिंगच्या क्षेत्रातही ती सक्रिय आहे.