तलावांच्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव `मृत’?

२४ दिवसांत सलग तिसऱ्यांदा माशांचा मृत्यू

ठाणे: तलावांचे शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावात २४ दिवसांत सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून, महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल ठरले आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून, तलावाची निगा राखण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परंतु, या कंत्राटदारावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहेरनजर ठेवली जात आहे. त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झाली नाही. परिणामी २४ एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे १० मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता. तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचे आढळले आहे.

या प्रकरणाची महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचे कारण सांगण्यात आले. प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते. मात्र, तीन वेळा माशांच्या मृत्यूची घटना घडूनही, मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही. शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घडलेली नाही. त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर २४ दिवसांत काहीही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला. या तलावाची स्थिती सुधारण्यात महापालिका अपयशी ठरल्यामुळे, सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला, असे समजायचे का, असा सवाल नारायण पवार यांनी केला.