चिनाब, झेलम, सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू

भारताने आखली रणनीती

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता अशातच, भारताने पाकिस्तानला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रदेशातील मुख्य प्रकल्पांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रणबीर धरणाची लांबी दुप्पट करणे. या नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानातील पंजाबमधील शेती क्षेत्रात जाते.

रिपोर्टनुसार, जेव्हा भारत आपला प्रकल्प पूर्ण करेल, तेव्हा ते प्रति सेकंद 150 घनमीटर पाणी वळवू शकेल, सध्या फक्त 40 घनमीटर पाणी वळवण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी त्यांच्या संसदेत सांगितले की, त्यांच्या सरकारने भारताला पत्र लिहून सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील जल सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड मिशेल म्हणाले की, भारताला धरणे, कालवे किंवा इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी वेळ लागेल. पण, त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला की, त्यांना भारताकडून कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागू शकते, हे आता कळले असेल.

दरम्यान, रणबीर कालव्याच्या विस्ताराच्या योजनेसोबतच, भारत अशा प्रकल्पांवरही विचार करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानला वाटप केलेल्या नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कमी होईल. यामुळे पाकिस्तानला स्वतःसाठी वीज निर्मिती करण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

भारताने जलविद्युत प्रकल्पांची यादी केली तयार

अहवालानुसार, भारताने जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केली आहे, ज्यामुळे वीज निर्मिती 3,360 मेगावॅटवरून 12,000 मेगावॅटपर्यंत वाढेल. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकणारी धरणे देखील समाविष्ट आहेत.