कॅडबरी मेट्रो स्थानकावर छत उभारणीला वेग

नितीन कंपनी उड्डाणपुलावरील वाहतूक रात्रीच्या वेळेत बंद

ठाणे : ठाणे येथील कॅडबरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावरील वाहतूक २५ मेपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक पुलाखालील मार्गावरून वळविण्यात येणार असल्याने रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तसेच घोडबंदर असे दोन महामार्ग जातात. हे दोन्ही महामार्ग माजिवडा भागात एकमेकांना जोडण्यात आलेले असून या ठिकणी माजिवडा उड्डाण पुल आहे. या पुलाशेजारीच असलेल्या माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले. यासाठी माजिवडा पुलावरील वाहतूक रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता अशाचप्रकारे कॅडबरी मेट्रो स्थानकावरील छत उभारणीच्या कामासाठी नितीन कंपनी उड्डाण पुल रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसुचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार, कॅडबरी मेट्रो स्थानकावर छत उभारण्यासाठी खांब उभारण्यात आलेले आहेत. तसेच त्यावर जॅक बीम टाकण्यात येणार असून यानंतर राफ्टर उभारण्यात येणार आहे. हे काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या सहाय्याने केले जाणार आहे. ही क्रेन मुंबई-नाशिक महामार्गावरील नितिन कंपनी उड्डाण पुलावर कॅडबरी परिसरात उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नितीन कंपनी पुलावरील वाहतूक १६ ते २५ मे या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

मुबंईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितिन उड्डाण पुल चढणीजवळच प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक नितिन उड्डाणपुलाशेजारी असलेल्या रस्त्याने नितीन कंपनी चौक आणि कॅडबरी जंक्शन येथून कापुरबावडी मार्गे दिशेने इच्छित स्थळी जातील.ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.