खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५
ठाणे: भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आयोजित खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या सर्वेश यादव आणि ओम गवंडी यांनी मुलांच्या डबल्स गटात ब्रॉन्झ मेडल मिळवत ठाण्याचा झेंडा फडकवला.
या स्पर्धेत सर्वेश यादव आणि ओम गवंडी यांनी कर्नाटकच्या अमिथ राज एन आणि हार्दिक दिव्यांश या जोडीवर पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवत २१-१३, २१-१७ अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला आणि क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर बिहारच्या पराग सिंग आणि रणवीर सिंग यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक खेळाचे दर्शन घडवत २१-१८, २१-११ असा सहज विजय मिळवला. त्यांनी सेमी फायनलमध्ये कमालीच्या संघर्षातून पराभव स्विकारावा लागला, मात्र त्यांच्या एकूण प्रदर्शनावर एक स्वच्छ, प्रगल्भ आणि संयमी खेळाची छाप राहिली.
सर्वेश यादव हा मूळचा साताऱ्याचा असून २०१८ पासून आपल्या संपूर्ण कुटुंबासह ठाण्यात स्थायिक होऊन केवळ बॅडमिंटनच्या आवडीपोटी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत नियमित सराव करत आहे. दुसरीकडे, ओम गवंडी हा या अकॅडमीतील जन्मापासून घडलेला खेळाडू असून अकॅडमीचा अत्यंत शिस्तप्रिय, मेहनती आणि समर्पित शटलर आहे. दोघांनीही यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या जोडीचे कौशल्य दाखवले आहे आणि विजेतेपद मिळवले आहे.