दोन दिवसांत सोन्याच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत. गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल आठ हजार रुपयांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर चार हजार रुपयांनी घसरलेले सोने सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा चार हजार रुपयांनी खाली आले.

रविवार 11 मे रोजी 96,710 रुपयांवर आलेल्या सोन्याचा भाव आता आणखी चार हजार रुपयांनी घसरला आहे. आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92,910 रुपयांवर आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिका चीनच्या टॅरीफ कराच्या चर्चेनंतर सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात लाखांच्या घरात मुसंडी मारल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत साशंकता दिसून आली. गेल्या दोन दिवसांचे उतरते भाव पाहता अनेकजण पुन्हा सोने खरेदीचा विचार करू लागले आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 12 मे रोजी, मुंबई, पुण्याच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,710 एवढी झालीय. तर 22 कॅरेट सोन्याला प्रति 10 ग्रॅम 85,287 रुपयांचा भाव सुरु आहे. गेल्या आठवड्यात एक लाख 500 रुपये असणाऱ्या सोन्याचा भाव रविवारी 96,710 रुपयांवर आला. तर सोमवारी तो आणखी चार हजार रुपयांनी घसरला असून प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 92,910 ते 93010 रुपये भाव झाला आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात काहीसा चढउतार सुरु असल्याने अनेकजण सोनेखरेदीबाबत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी घसरण कशाने?
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली. जगभरातील शेअरमार्केट गडगडल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा सर्वाधिक भाव गाठला. देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढल्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला सुरुवात झाली. भारत-पाकिस्तान संघर्ष आणि बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरण निर्णयांमुळे गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार दिसून आले. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे शेजारील देशांमधील तणाव वाढला, ज्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली. एकीकडे भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती निवळण्याची स्थिती असतानाच अमेरिकेने चीनमधील वस्तूंवरील आयात शुल्क 145 टक्क्यांवरून कमी करून 30 टक्क्यांपर्यंत केले आहे. हे बदल 90 दिवसांसाठी करण्यात आले असून चीननेही अमेरिकन वस्तूंवरील शुल्क 125 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत 90 दिवसांसाठी कमी केले आहेत. या निर्णयाचा परिणामही आजच्या सोन्याच्या दरघसरणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.