बेरीज बुमरँग होऊ शकते !

क्रिकेटमध्ये एक प्रघात आहे. तो किती योग्य यावर चर्चा होत रहाते. एखादा पाहुणा संघ जेव्हा दुसऱ्या देशाचा दौरा करतो, तेव्हा खेळपट्टी ही सर्वसामान्यत: यजमानांना मदत करणारी अशीच बनवली जाते. यामुळे पाहुण्यांना विजय मिळवणे कठीण होऊन बसते. काही जणांना हा रडीचा डाव वाटतो आणि खेळावर एकूण अन्याय होतो अशी टीकाही केली जाते. क्रिकेटमधील हा वादग्रस्त प्रघात मान्य झाला असून त्याची पुनर्रावृत्ती अन्य क्षेत्रांतही दिसू लागली आहे. देशातील राजकारणात पक्षांतरे ही सर्दी-पडशासारखी होत रहातात. एखाद्या चित्रपटात अथवा छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अभिनेते जसे पटापट वेशभूषा बदलत रहातात तशी पक्षांतरे सुरू असतात. बिहार, हरयाणा आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये रुजलेली ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती महाराष्ट्रात फोफावत आहे. त्यामुळे राजकारणातील साचलेपण थांबले असले तरी वैचारिक आणि तात्विक अधोगती मात्र झपाट्याने सुरू आहे.

जो पक्ष अशा ‘इनकमिंग’ला प्रोत्साहन देतो त्यावर या अनैतिकतेचे खापर फोडावे का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे. कारण आयारामांना कोणी जबरदस्ती करीत नसतो. त्यांना पक्ष सोडावासा वाटतो कारण त्यांच्यावर अन्याय होत असतो. यामुळे अन्यायाविरुध्द पक्षांतर केले असा दावा करताना ते त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा विचार करुनच निर्णय घेत असतात. बेरजेचे राजकारण हा शब्दप्रयोग इतका गुळगुळीत झाला आहे की त्यातील अनैतिकतेची टोके पार बोथट होऊन गेली आहेत. असो. विषय आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून माजी महापौरांसह अनेक जुने नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी हाती धनुष्यबाण घेण्याचा निर्णय. पक्ष फोडला अशी टीका श्री. एकनाथ शिंदे यांच्यावर होऊ लागली आहे. परंतु आपले जुने नगरसेवक एकगठ्ठा का सोडून जात आहेत याचा विचार ते करणार आहेत का? पक्षांतराचे पेव फुटले ते कळवा-खारेगाव भागात. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांचा आहे. त्यामुळे पक्षांतराला शिंदे विरुध्द आव्हाड असे परिमाण लाभले आहे. राज्याच्या पटलावर या दोघांचे स्थान आणि महत्व लक्षात घेता या पक्षांतराचा त्यांच्या भवितव्यावर आणि त्यांच्या होम पिचवरील पुढील सामन्यांवर होणार आहे. त्यापैकी एक आगामी ठाणे महापालिका निवडणूक हा आहे. शिवसेनेचे पारडे जड होणे याचा त्रास मात्र राष्ट्रवादीपेक्षा भाजपाला होऊ शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. ही सर्व मंडळी भाजपाच्या वाटेवर होती असे बोलले जात आहे. श्री. शिंदे यांनी अखेर बाजी मारली आणि आगामी सामन्यासाठी तगडा संघ निर्माण करण्याची तजविज केली. इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल आणि तो असा की काही वर्षांपूर्वी शिवसेना नगरसेवकांनी घाऊक राजीनामे देऊन काँग्रेसच्या हाती हीच ठामपा सुपूर्द केली होती. श्री. शिंदे यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवले आहेत. वास्तविक वसंत डावखरे महापौर झाले ते भाजपाला खिंडार फोडून. देवराम आणि सुभाष भोईर तसेच गोवर्धन भगत या तीन एक्क्यांना काँग्रेसने आपल्या तंबूत आणले होते. भाजपाचे आजचे नेतृत्व हा वचपा काढू शकले असते!

या पक्षांतराचे आणखी एक आश्चर्य असेही वाटत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जे शिवसेनेत गेले त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय का घेऊ नये? राष्ट्रवादीत आपले भवितव्य सुरक्षित रहाणार नाही या भावनेने तर त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले नसेल? श्री. शिंदे यांचा करिश्मा त्यांना अधिक उपयुक्त ठरेल अशी खात्री वाटत असावी.
या पक्षांतरामुळे शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. या इनकमिंगमुळे त्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. श्री. शिंदे यांच्याकडे त्याबाबत कोणती उपाययोजना आहे, हे यथावकाश समजेल. परंतु बेरजेचे राजकारण बूमरँग तर होणार नाही ना याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. मुंबई महापालिका जशी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांना महत्वाची आहे, तशी ठाणे महापालिका निवडणूक श्री. एकनाथ शिंदे यांच्यासाठी. होम-पिचवर त्यांना आधीपेक्षा जास्त ठळकपणे सिध्द करावे लागणार आहे. त्यांचे वजन त्यामुळे वाढणार आहे. पक्षांतरावर स्थानिक कार्यकर्त्यांचे जसे भवितव्य अवलंबून असते तसे दिग्गज नेत्यांचेही.