महापालिकेचे प्रदूषण नियंत्रणाचे प्रयत्न फोल : नारायण पवार
ठाणे: महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात पुन्हा एकदा हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २४ एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाल्यानंतर महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केला आहे.
सिद्धेश्वर तलावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. यापूर्वी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही जलपर्णी काढली गेली नव्हती. परिणामी २४ एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा १५ दिवसांनंतर तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला.
या तलावात मासे मरून पडल्याचे काल दुपारी काही रहिवाशांना आढळले. त्यांनी माजी गटनेते नारायण पवार यांना माहिती दिल्यानंतर श्री. पवार यांनी पुन्हा महापालिकेकडे संपर्क साधला. गेल्या १५ दिवसांत तलावातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी महापालिकेने कोणती उपाययोजना केली. माशांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला का, तलावातील प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नाही, याबद्दल नारायण पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.