परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
नवी दिल्ली: पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान यानंतर भारत आणि पाकिस्तानाने एकमेकांवर हल्ले केले आहेत. काल देखील पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन सोडण्यात आले होते. ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
आज परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सौफिया कुरेशी यांनी पाकिस्तानी ड्रोन्स आणि त्यांना देण्यात आलेलं प्रत्तुत्तर याबद्दल सविस्त माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत कर्नल सौफिया कुरेशी यांनी सांगितलं की, “८ ते ९ मे २०२५च्या मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराने लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या हेतूने संपूर्ण पश्चिमी लष्करावरील भारतीय हवाई सीमेचे वारंवार उल्लंघन केले. इतकेच नाही तर पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर मोठ्या कॅलिबरच्या हत्यारांनी गोळीबार देखील केला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून ते सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन्सचा वापर घुसखोरीसाठी केला. भारतीय सुरक्षा दलांनी कायनेटिक किंवा नॉन कायनेटीक साधनांच्या मदतीने यापैकी काही ड्रोन्स पाडले.”
कर्नल सौफिया कुरेशी पुढे बोलताना म्हणाल्या की, “इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या हवाई घुसखोरीचा संभावित उद्देश वायु रक्षा प्रणालींचे परिक्षण करणे आणि गुप्त माहिती गोळा करणे हे होता. ड्रोन्सच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. प्राथमिक अहवालानुसार, ते तुर्कीचे ॲसिसगार्ड सोनगर ड्रोन होते. याशिवाय रात्री पाकिस्तानच्या एका सशस्त्र युएव्हीने भटिंडा लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पकडून निष्क्रिय करण्यात आले. पाकिस्तानी हल्ल्याच्या बदल्यात पाकिस्तानात चार हवाई सुरक्षा तळांवर सशस्त्र ड्रोन्स लाँच करण्यात आले. यापैकी एका ड्रोनने एडी रडारला यशस्वीरित्या नष्ट केले.”
“पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या तंगधार, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अकनूर आणि उधमपूर येथे मोठ्या कॅलिबरच्या आर्टिलरी गन आणि सशस्त्र ड्रोन्सचा वापर करत नियंत्रण रेषेवर गोळीबार देखील केला. ज्यामुळे भारतीय सेनेचे काही जवान शहीद आणि जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या भारताच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे देखील मोठे नुकसान करण्यात आले,” असेही कर्नल कुरेशी यांनी यावेळी सांगितले.