भाजपला चकवा देत राष्ट्रवादीचे सात माजी नगरसेवक शिवसेनेत

कळव्यात राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: कळव्यातील जितेंद्र आव्हाड समर्थक माजी नगरसेवकांनी भाजपला चकवा देत हाती धनुष्यबाण घेतले. मुंबईत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कळव्यात राष्ट्रवादी रिकामी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य गड समजल्या जाणार्‍या कळव्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत शिवसेनेने ऑपरेशन ‘धनुष्यबाण’ यशस्वी केले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या माजी नगरसेवकांना घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. आणि ते जवळपास यशस्वी झाले होते. यामुळे भाजपची कळव्यात ताकद वाढून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या भाजपच्या भूमिकेला आणखी मजबुती मिळणार होती. तर शिंदे गट शिवसेनेला हा अप्रत्यक्षपणे मोठा धक्का बसणार होता. परंतु शेवटच्या क्षणी हे नगरसेवक भाजपाऐवजी शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे या ‘कौशल्य’पूर्ण कलाटणीमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कळव्यात एकूण १६ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे होते. यामध्ये एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. तर एक माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नऊ माजी नगरसेवक राहिले होते. त्यापैकी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील व प्रमिला केणी यांच्यासह माजी नगरसेविका मनाली पाटील, महेश साळवी, मनिषा साळवी, सचिन म्हात्रे, सुरेखा पाटील या सात माजी नगरसेवकांसह मंदार केणी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात आता केवळ दोनच शिलेदार उरले असून त्यांनाही गोटात घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे उजवे हात ओळखले जातात त्यामुळे कळवा मुंब्रा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण नियोजनाची जबाबदारी ते सांभाळत होते. कळवा पूर्वचे नगरसेवक महेश साळवी हे आव्हाडांचे विश्वासू नगरसेवक म्हणून ओळख होती राष्ट्रवादीच्या सभेला व आंदोलनाला पारसिक डोंगर पट्ट्यातील हजारो नागरिकांना आणण्याचे काम महेश साळवी करीत होते. तर दरवर्षी प्रमिला केणी व दिवंगत मुकुंद केणी हे हजारोंच्या फरकाने कळव्यातून निवडून येत होते. आव्हाडांच्या या विश्वासू शिलेदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आव्हाड यांना हा मोठा धक्का बसला आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो. उपमुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत. त्यामुळे भविष्यात विकासनिधीच्या माध्यमातून सहकार्य मिळेल असे अर्थपूर्ण वचन या नगरसेवकांना मिळाल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने भाजपात जाण्याची तयारी केली होती. त्यामुळे भाजपची ताकद वाढून आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार होती. ही नगरसेवक भाजपात जाऊ नयेत म्हणून शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले होते. अखेर हे प्रयत्न ‘कौशल्य’पूर्ण पद्धतीने यशस्वी झाले आणि हे नगरसेवक भाजपची वाट सोडून शिवसेनेत दाखल झाले.