इगतपुरी-आमणे समृद्धीचे लोकार्पण पुढील आठवड्यात

मुंबई: शुक्रवारी ९ मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पण दुसरीकडे इगतपुरी ते आमणे अशा शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मात्र रखडले आहे. शुक्रवारी केवळ मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ चे लोकार्पण होणार असून इगतपुरी ते आमणे टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे. दरम्यान पुढील आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

नागपूर ते मुंबई अंतर १६ तासांऐवजी आठ तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्रा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. ५५ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली.

प्रकल्पाचे जसेजसे काम पूर्ण झाले तसतसा टप्प्याटप्प्यात महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. त्यानुसार नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर शिर्डी ते भरवीर असा ८० किमीचा टप्पा मे २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर भरवीर ते इगतपुरी असा २५ किमीचा महामार्ग मार्च २०२४ मध्ये सुरु झाला. हे टप्पे सुरु झाल्यानंतर शेवटचा, महत्त्वाचा असा इगतपुरी ते आमणे असा ७६ किमीचा टप्पा केव्हा वाहतूक सेवेत दाखल होणार आणि नागूपर ते मुंबई अंतर आठ तासात केव्हा पार करता येणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. ही प्रतीक्षा मार्च २०२५ मध्ये संपेल असे वाटत होते. तसे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र काही तुरळक कामे राहिल्याने मार्चचा मुहुर्त एमएसआरडीसीला गाठता आला नाही. त्यानंतर उर्वरित काम पूर्ण करत एप्रिलमध्ये इगतपुरी ते आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र हा मुहूर्तही चुकला आणि आजही शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम आहे.

काम पूर्ण झाले असतानाही रस्त्याचा वापर करता येत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या महामार्गाचा बेकायदेशीररित्या वाहनचालकांकडून वापर केला जात आहे. त्यांना रोखण्याचे आव्हान एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे. मात्र लोकार्पण रखडल्याने एमएसआरडीसीच्या अधिकारी-कर्मचार्यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ सह एकत्रित समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचेही लोकार्पण करण्याचा घाट राज्य सरकारने घातला. त्यानुसार १ मे चा मुहुर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र हा मुहुर्त चुकला. मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ साठी सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने मुहुर्त चुकला आणि समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर पडले. अशात आता मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ चे लोकार्पण उद्या, शुक्रवारी (९मे) होणार आहे. पण समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. याविषयी एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकार्यांना विचारले असता त्यांनी लोकार्पणाची तयारी आमच्याकडून पूर्ण झालेली आहे. पुढील आठवड्यात लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, असे सांगितले. त्यामुळे आता पुढील आठवड्यात तरी इगतपुरी ते आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल होतो की आणखी प्रतीक्षा वाढते हे लवकरच स्पष्ट होईल.