रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

वनडे सामने खेळणार

मुंबई: भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

हिटमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहितने बुधवार 7 मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. रोहितच्या निवृत्तीची बातमी अशा वेळी आली जेव्हा निवड समितीने त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेणार होती आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती.

काही महिन्यांपासून रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषतः त्याचे कर्णधारपद धोक्यात होते. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ०-३ असा क्लीन स्वीप. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या पराभवानंतर रोहितला कर्णधारपदावर राहणे कठीण वाटत होते. पण, रोहितला आशा होती की तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि संघाचे नेतृत्व करेल. पण मंगळवारी 6 मे रोजी निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, ज्याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली होती.

रोहित शर्मा कसोटी कारकीर्द

अशा परिस्थितीत, रोहितची संघात निवड होणे अशक्य झाले होते, कारण गेल्या एक वर्षापासून त्याची बॅट या फॉरमॅटमध्ये शांत दिसत होती. अशा परिस्थितीत ‘हिटमॅन’ने या फॉरमॅटला अलविदा करण्याची निर्णय घेतला. रोहितने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. पण, त्यानंतर पुढील सहा वर्षे तो या फॉरमॅटमध्ये संघर्ष करत राहिला आणि संघात आत बाहेर करत राहिला. तरी रोहित हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला, त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4301 धावा केल्या आहेत.