अवकाळी पावसाने ठाण्याला झोडपले

ठाणे: ठाण्यात मंगळवारी रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल रात्रीपासून सुरु झालेला पाऊस बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी देखील सुरु होता.

या कालावधीत शहरात जवळपास २२ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्या देखील पडल्या. वाहनांवर झाड कोसळून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान देखील झाले आहे. राबोडी येथे नाल्याची संरक्षक भिंत कोसळली. तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा रात्रीच खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात बसावे लागले. शहरात ठिकठिकाणी काही वेळातच पाणी साचण्याच्या घटना देखील घडल्या असून महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पावसाळ्यात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने दोन महिने आधीच धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दोन हजारांपेक्षा अधिक झाडांच्या फांद्या छाटण्याचा दावा देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. मात्र प्रशासनाचा हा दावा अक्षरशः फोल ठरला असून मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारपर्यंत २२ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. पाचपाखाडी परिसरातील चार दुचाकींवर झाड कोसळल्याने या सर्व बाईकचे नुकसान झाले. खारकर आळी या ठिकाणी देखील झाड पडल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे वागळे, बाळकूम, पाचपाखाडी अशा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या देखील घटना घडल्या असून यामध्ये बाजारपेठ, वंदना सिनेमा, स्टेशन परिसर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नेहमीच वाहतूक कोंडी असलेल्या घोडबंदर पट्ट्यात बुधवारी सकाळी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. जोरदार झालेल्या पावसामुळे एसटी वर्कशॉपशेजारी असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला.

रात्रीपासून सुरु झालेला पाऊस बुधवारी सकाळ-संध्याकाळी देखील सुरु होता. त्यामुळे बुधवारी दिवसभर वातावरण पूर्ण ढगाळ होते. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला होता. रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी प्रशासनाच्या पाणी साचण्याच्या ठिकाणी पंप बसवले आहेत. तर नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवा असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.