मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवाशांकडून कागदी तिकीटांऐवजी डिजिटल तिकीटांना सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. या मार्गिकेवरील एकूण प्रवाशांच्या ६५ टक्के प्रवासी डीजिटल तिकीटाचा वापर करत प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यातही व्हाटसॲप तिकीट खरेदी करण्यांची संख्या यात अधिक असून देशात व्हाटसॲप तिकीटांचा सर्वाधिक वापर मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावर होताना दिसतो.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका टप्प्याटप्प्यात दाखल झाल्या असून सध्या या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावत आहेत. या दोन्ही मार्गिकांनी अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठलेली नाही. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून या मार्गिकांवरील प्रवासी संख्या हळूहळू वाढत आहे. त्यातही प्रवासी संख्या वाढावी आणि प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुकर व्हावा यादृष्टीने एमएमआरडीएने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी डिजिटल तिकीटांचे विविध पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन दिले जात आहेत.
तर एमएमआरडीएच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. कारण डिजिटल तिकीटांना प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे आजच्या घडीला मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर एकूण प्रवाशांपैकी केवळ ३५ टक्के प्रवासी कागदी तिकीटांचा वापर करत आहेत. तर ६५ टक्के प्रवाशी डिजिटल तिकीट वापर असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर ६५ टक्के डिजिटल तिकीटांचा वापर केला जात असतानाच देशात सर्वाधिक व्हाॅटसॲप तिकीटांचा वापर हा या मार्गिकांवर होत असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
१९ टक्के प्रवाशी व्हाॅटसॲप तिकीटांचा वापर करताना दिसतात. तर एनसीएमसी कार्डचा वापर करणारे प्रवाशी ४४ टक्के, व्हाॅटसॲप तिकीट वापरणारे १९ टक्के, मोबाईल ॲपचा वापर करणारे दोन टक्के याप्रमाणे ६५ टक्के प्रवासी डीजिटल तिकीटांचा वापर करत आहेत. त्याचवेळी या दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी संख्या वाढत असून आजच्या घडीला अडीच लाखांहून अधिक प्रवासी दिवसाला या मार्गिकांवरुन प्रवास करत आहेत. महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी प्रवाशांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करत एमएमआरडीए प्रवाशांच्या सुकर आणि अतिजलद प्रवासासाठी वचनबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.