यंदाही मुलींची बाजी, मुलांचा निकाल पाच टक्क्यांनी कमी

 

मुंबई : बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.

यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49ने घसरला आहे.

विभागनिहाय निकाल

कोकण : 96.74 टक्के
पुणे : 91.32 टक्के
कोल्हापूर : 93.64 टक्के
अमरावती : 91.43 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
नाशिक : 91.31 टक्के
लातूर : 89.46 टक्के
नागपूर : 90.52 टक्के
मुंबई : 92.93 टक्के

बारावीचा शाखानिहाय निकाल
शाखा निकाल
विज्ञान 97.35 टक्के
कला 8.52 टक्के
वाणिज्य 92.68 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम 83.03 टक्के
आयटीआय. 82.03 टक्के

बारावीची परीक्षा ज्या परीक्षा केंद्रांवर पार पडली, त्या एकूण 3373 परीक्षा केंद्रांपैकी 124 परीक्षा केंद्रांची चौकशी होणार आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं आढळल्यामुळे या केंद्रांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान, केंद्रांची चौकशी करताना, केंद्रांवर परीक्षेवेळी झालेला गैरप्रकार सिद्ध झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेवेळी कॉपी होण्याची प्रकरणं वाढली आहे. नव विभागीय मंडळात कॉपी प्रकरणी 124 केंद्रांवर चौकशी करुन त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यात पुण्यातील 45, नागपुरातील 33, छत्रपती संभाजी नगरमधील 214, मुंबईतील 9, कोल्हापुरातील 7, अमरावतीतील 17, नाशकातील 12, लातुरातील 37 अशा एकूण 374 कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी असून त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट अग्ले. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 12.38 आहे. बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा राज्यभरात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी मुलांची आकडेवारी 8,10,348 होती, तर मुलींची आकडेवारी 6,94,652 होती. तर, 37 ट्रान्सजेंडर परीक्षेला बसले होते.